वणी शहरात आणि परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घरफोड्या आणि चोरीच्या मालिकेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या गुन्ह्यांमागे मुख्य सूत्रधार ठरलेला अमोल ऊर्फ भुऱ्या उर्फ विजय ठाकरे (वय ३२, रा. रामनगर, चिखलगाव) अखेर पोलिसांच्या कारवाईत गवसला आहे. या आरोपीवर वारंवार गुन्हे दाखल होत असल्याने आणि त्याच्यामुळे नागरिकांना निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत तडीपार केले आहे.
घरफोड्यांची मालिका
सन २०१२ पासूनच भुऱ्या याने चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. मागील काही वर्षांत तर त्याने घरफोड्यांचा अक्षरशः पाऊस पाडला. नागरिकांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर पडताच तो पुन्हा नवीन चोरी करत असे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
पोलिसांचा धडाकेबाज निर्णय
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरात शांती प्रस्थापित करण्यासाठी वणी पोलिसांनी जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, पोलिस निरीक्षक वणी यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल केला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी एम.पी.डी.ए. अंतर्गत, झोपडपट्टी दादा,हातभट्टीवाले, धोकादायक वर्तन, रेती व जीवनावश्यक वस्तू माफिया,अश्या कारवायांना आळा घालण्यासाठी अधिनियम १९८१ अन्वये आदेश प्राप्त होताच
अमोल ऊर्फ भुऱ्या विजय ठाकरे याला तडीपार करण्यात आले आहे. या आदेशानुसार आरोपीला नागपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची टीम सक्रिय
या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गुल्हाने, तसेच पोलीस पथकातील शिराज शेख, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुडमेथे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
नागरिकांचा दिलासा
भुऱ्या याच्यावरील तडीपार कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक वर्षे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांच्या या धाडसी पावलामुळे आता शहरात शांती व सुरक्षितता निर्माण होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.