अवैध रेती वाहतुकी विरोधात कठोर पावले उचलत वणी पोलिसांनी मंदर परिसरात कारवाई मध्ये एक ट्रॅक्टर जप्त केला असून, चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ५ ऑगस्ट२०२५ रोजी रात्री १२:१५ वाजता करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिस हवालदार सचिन मरकाम व पोलिस कॉन्स्टेबल श्रीनिवास गोंलावार यांनी मंदर येथे धाड टाकली असता(MH 29 CB 7742) क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळून आला. चौकशीअंती चालकाने आपले नाव दिनेश नानाजी गुहे (वय ३१, रा. मंदर) असे सांगितले.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत ट्रॅक्टरमध्ये सुमारे १ ब्रास रेती (किंमत अंदाजे ७ हजार रुपये) आढळून आली. परंतु चालकाकडे रेती वाहतुकीसाठी कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी पोलिसांनी ४.५० लाख किमतीचा ट्रॅक्टर आणि रेती असा एकूण ४.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व महाराष्ट्र जमीन महसूलकायद्यानुसार कलम ४८ (८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, वणी यांच्या आदेशानुसार पार पाडण्यात आली…