पंचशील चौक परिसरातील रहिवाश्यांनी नगर परिषदेकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. रजा कमिटी तर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंचशील चौक, दारुल उलूम ते शहीद अब्दुल हमीद पुतळा या मार्गावरील रस्ते खड्ड्यांनी भरले असून पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी साचल्यामुळे नागरिक, वाहनधारक तसेच शालेय विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून अनेकदा किरकोळ अपघातही घडले आहेत.
येत्या ५ सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबी निमित्त पंचशील चौक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार आहेत. अशा वेळी या भागातील रस्त्यांची बिकट अवस्था नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकते, असेही समितीने नमूद केले आहे.
रझा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.