शहरालगतच्या गणेशपूर गावात रविवारी रात्री उशिरा जुगाराच्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृतकाचे नाव संजय प्रभाकर कावरे (४२, रा. गणेशपूर) असे असून, आरोपी संदीप सुर्यभान इसापुरे (४०, रा. गणेशपूर) याला वणी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गणेशपूर स्मशानभूमी परिसरात पत्त्यांचा खेळ खेळत होते. खेळा दरम्यान सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच उग्र झाला. संतापलेल्या संदीप इसापुरेने दगड उचलून संजय कावरेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेला संजय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व जागीच मृत्यू पावला.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वणी तालुक्यातील मंदर गावात एका वृद्धाचा अशाच प्रकारे खून झाल्याची घटना ताजी असतानाच गणेशपूर येथे पुन्हा अशीच हत्या घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पावधीत घडलेल्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.