दोन आठवड्यांत दोन पोलिसांचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुढे…
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव व मुकुटबन येथून आलेल्या धक्कादायक घटनांनी सर्वत्र खळबळ माजली आहे. अवघ्या पंधरवड्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मारेगाव येथील पोलिस अधीक्षक उमेश बेसरकर (वय ५७) आणि मुकुटबन पोलिस ठाण्यातील हवालदार उमेश डोंगरे (वय ४३) या दोघांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर असणाऱ्या पोलिस दलातील ही सलग झालेल्या दोन मृत्यूंच्या घटना चिंताजनक आहेत. कर्तव्य बजावताना अनियमित ड्युटी, झोपेचा अभाव, वाढता ताण आणि व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
भरतीदरम्यान पोलिस उमेदवार तासन्तास मैदानावर घाम गाळतात, फिटनेस चाचण्या पार करतात. मात्र नोकरी लागल्यानंतर सततच्या कामाच्या व्यापामुळे त्याच फिटनेसकडे दुर्लक्ष होते. फिटनेस, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याची काळजी यांची कमतरता आता प्राणघातक ठरत असल्याचे चित्र उभे राहते.
पोलिस दल हे समाजाच्या सुरक्षेची हमी देत असते, पण आज प्रश्न असा आहे की —
पोलिसांचे संरक्षण कोण करणार?
त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोलिसांना नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन,
योग–व्यायाम,तसेच योग्य आहाराच्या सवयी याकडे वळवणे ही काळाची गरज आहे. फिटनेस म्हणजे केवळ बाह्य शरीरयष्टी नसून, मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठीचे बळही आहे.
आज जे दोन जीव गमावले गेले, त्यांनी नागरिकांच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वाहिले होते. त्यांच्या मृत्यूने एक मोठा इशारा दिला आहे .
पोलिसांचे आरोग्य सुरक्षित ठेवले नाही, तर संपूर्ण समाज असुरक्षित होईल.