वणी पोलिस स्टेशन हद्दीत मंदर शिवार, गौरी विहार लेआऊट येथे सोमवारी पहाटे एका वृद्ध व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना अंदाजे 60 वर्षीय इसमाचा नग्नावस्थेत, रक्तरंजित व उलटा पडलेला मृतदेह आढळून आला. मृतकाच्या नाकातून व कानातून रक्त वाहत होते. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, सपोनी निलेश अपसुंदे, सपोनी दत्ता पेंडकर, पोउपनि धीरज गुल्हाने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृतकाच्या चेहऱ्यावर दगडाने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतकाचे कपडे जवळच असलेल्या नालीतील सिमेंट चेंबरमध्ये आढळले.
मृतकाची ओळख देवराव गुंजेकर (वय 60, रा. वागदरा) अशी झाली असून तो भंगार वेचण्याचे काम करीत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून खून नेमका कशासाठी करण्यात आला याचा तपास सुरु आहे.