1.50 लाखांची रोकड गायब
शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये भर टाकणारी आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रॉपर्टी डीलर बंडू तुकाराम बानकर (वय 55, रा. गणेशपूर, छोरिया लेआउट) यांची दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
मिळालेल्या माहितीनुसार,25 ऑगस्ट 2025 रोजी बानकर हे व्यवसायाच्या कामासाठी मित्रासह बँकऑफ बडोदा शाखेत गेले होते. तेथे त्यांनी 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड काढून आपली आयक्यूब इलेक्ट्रिक दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवली. त्यानंतर काही वेळ अन्य कामासाठी ते शहरात फिरत होते.
दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास राम शेवाळकर परिसरात ते एका परिचिताच्या कार्यालयात गेले असता बाहेर आल्यावर डिकीची कागदपत्रे जमिनीवर विखुरलेली दिसली. शंका आल्याने त्यांनी डिकी तपासली असता, बँकेतून काढलेली रोकड गायब असल्याचे लक्षात आले.
तत्काळ मित्राच्या मदतीने परिसरात शोध घेण्यात आला, मात्र रोकड कुठेही आढळली नाही. अखेरीस त्यांनी वणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील सलग होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोकड ने–आण करताना खबरदारी घ्यावी, तसेच ती शक्यतो सुरक्षित ठिकाणी ठेवावी.