वणी:–
वर्तमान काळातील कुटुंब संरचनेतील बदल हे सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, शैक्षणिक आणिसांस्कृतिक परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे स्वातंत्र्य वाढले परंतु भावनिक नाती काही प्रमाणात कमी झाली. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये स्वातंत्र्य कमी असेल तरी कुटुंबासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक त्याग हा मुख्य संस्कार होता. असे प्रतिपादन प्राचार्य रोहित वनकर यांनी केले. ते नगरवाचनालयात विदर्भ साहित्य संघ वणी व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे 48 वे पुष्प गुंफताना वर्तमानातील कुटुंब संरचनेतील परिवर्तन याविषयावर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राणानुर सिद्दिकी उपस्थित होत्या.
आपला विषय मांडताना वनकर पुढे म्हणाले की, भारतात कुटुंबे संयुक्त स्वरूपाचे होते. त्याला धर्म, परंपरा, शेतीप्रधान अर्थव्यवस्था, एकत्र राहण्याची गरज याचा आधार होता. परंतु 19 व्या शतकापासून शिक्षण, औद्योगीकरण, इंग्रजी शासन, समाजसुधारकांची चळवळ यामुळे कुटुंब संरचनेत बदल घडू लागली औद्योगिक क्रांतीमुळे लोक गावातून शहराकडे गेले. त्यामुळे संयुक्त कुटुंब तुटली शिक्षणामुळे स्त्रियांना नवीन संधी मिळाल्या कुटुंबातील पुरुषप्रधान वर्चस्व कमी झाले आणि स्त्री–पुरुष समानतेकडे वाटचाल सुरू झाली. संयुक्त कुटुंबात आजी–आजोबा आणि इतर नातेवाईकांमुळे लहान मुलांचे संगोपन नीट आणि सुदृढ व्यक्ती होत होते. आता कुटुंबामध्ये वृद्ध नसल्यामुळे डे– केअर प्ले स्कूल कडे मुलांना पाठवावे लागते. त्यामुळे मूल्ये, संस्कार, परंपरा, सामूहिक जबाबदारी यात कुठेतरी कमतरता येऊन व्यक्तीवाद, स्वातंत्र्य आणि करिअर कडे कुटुंबांचा कल दिसत आहे.
अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. अलोने यांनी कुटुंब संरचनेत झालेल्या बदलाचा आढावा घेऊन कोणत्याही कुटुंबाचा आधार असलेला त्याग व प्रेम अबाधित रहावे ही अपेक्षा व्यक्त केली.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन वणी साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजीत अणे यांनी केले. आभार अशोक सोनटक्के यांनी मानले.