सिटी हब मिडिया वणी…
शहरातील गुरुनगर येथील रहिवासी रफिक शेख (वय ५२) यांचा गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. रफिक शेख हे जिलानी बाबा दरबार येथे आयोजित झालेल्या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी मंगळवारी आपल्या हुंडाई i20 कार (क्रमांक MH29 AR 5853) ने चालकासह गडचिरोलीला गेले होते.
![]()
दरबारातील कार्यक्रम संपवून ते रात्री वणीला परतत असताना, पाल नदीजवळील आरमोरी-गडचिरोली मार्गावर टमाटर भरून जात असलेल्या एका ट्रकने त्यांच्या कारला जबर धडक दिली. रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात रफिक शेख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिलानी बाबा यांच्या पुत्राच्या बरसीनिमित्त आयोजित शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी रफिक शेख वणी येथून मुरिद म्हणून गेले होते. कार्यक्रम संपवून परत येताना जिलानी दरबारपासून काही अंतरावर असलेल्या हायवेवर ते आपल्या मागे येणाऱ्या वाहनाची वाट पाहत उभे होते. त्या वेळी आरमोरीहून गडचिरोलीकडे येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.
या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक केली आहे.
स्थानिकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, शहरात शोककळा पसरली आहे.
रफिक शेख हे दर महिन्याला जिलानी बाबा दरबाराला दर्शनासाठी गडचिरोलीला जात असत.
श्रद्धेच्या मार्गावरचा शेवटचा प्रवास… रफिक शेख यांच्या निधनाने वणी शोकाकुल…
-
[gtranslate]



























