सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मेंढोली ते पिंपरी या प्रलंबित रस्ते कामासाठी ६३ वर्षीय मनोज काळे यांनी पुकारलेले ‘जंगल सत्याग्रह’ उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी यशस्वी झाले. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नामदार संजयजी राठोड यांच्या वतीने दिलेल्या ठोस आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

जनहितासाठी ६३ व्या वर्षी लढा…
मेंढोली परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटावा, यासाठी मनोज काळे यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी हे धाडसी पाऊल उचलले होते. त्यांच्या या आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. या आंदोलनाची दखल घेत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी धाव घेतली व काळे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शविला.
प्रशासकीय हालचाली आणि आश्वासनांची पूर्तता…
उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे यांनी पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पराग पिंगळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. पिंगळे यांनी “सदर रस्त्याचे काम तातडीने मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि नामदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण होईल,” अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बोरघाटे यांनी रस्त्याच्या कामाचे ‘इस्टिमेट’ उपोषणस्थळी प्रत्यक्ष सादर केले, ज्यामुळे आंदोलकांना प्रशासकीय प्रगतीचा पुरावा मिळाला.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…
तात्याजी पावडे यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “प्रशासनाने अशा संविधानिक मार्गाने चालणाऱ्या आंदोलनांची दखल घेणे आवश्यक आहे.” याप्रसंगी दीपकभाऊ कोकास, किरणताई नांदेकर, आशिष खुलसंगे, प्रसाद ठाकरे, राजू तुरणकर यांच्यासह विनायक ढवस, मोरेश्वर पोतराजे आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

उमेश वैरागडे व सहकाऱ्यांनी मनोज काळे यांनी शब्दाला मान देऊन उपोषण सोडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भविष्यातही गावातील इतर प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले.

























