सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
सरकारी नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. चंद्रपूर जिल्हा परिषदेत ‘आरोग्य सेवक’ पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून वणी तालुक्यातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?
चिखलगाव (ता. वणी) येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्र बोबडे यांना आरोपींनी जाळ्यात ओढले. आरोपी सुरेंद्र आस्कर (६२, रा. घोन्सा) आणि सचिन गारघाटे (५१, रा. चंद्रपूर) यांनी बोबडे यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या कामासाठी आरोपींनी बोबडे यांच्याकडून एकूण ७.५० लाख रुपये उकळले, ज्यामध्ये ७ लाख रुपये चेकद्वारे तर ५० हजार रुपये रोख स्वरूपात घेण्यात आले होते.
अशी उघड झाली फसवणूक…
आरोग्य सेवक पदाची परीक्षा झाल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल बंद करून संपर्क तोडला. संशय आल्याने बोबडे यांनी पाठपुरावा केला असता आरोपींनी त्यांना खोटे ‘इसार पत्र’ देऊन वेळ मारून नेली. अखेर दिलेले चेकही बँकेत बाऊन्स झाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे बोबडे यांच्या लक्षात आले.
पोलिस कारवाई…
फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सुरेंद्र आस्कर आणि सचिन गारघाटे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिस करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
“सावध राहा!” -वणी पोलिसांचे कळकळीचे आवाहन,
शासकीय विभागात नोकरी मिळवण्यासाठी पैसे देणे हा गुन्हा असून, अशा फसव्या प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये. नोकरीच्या नावावर कुणी पैशांची मागणी करत असेल, तर तात्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

























