सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्थानिक एमआयडीसी परिसरातील भालर मार्गावर असलेल्या एका औद्योगिक गोदामात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेल्या देशी-विदेशी दारूच्या मोठ्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अमरावती विभागीय भरारी पथकाने मंगळवारी पहाटे धडक कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांच्या मद्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ६३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुमानलाल बिहारीलाल साहू (वय ४२, मूळ रा. छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी इंडस्ट्रीज परिसरातील एका गोदामात छुप्या पद्धतीने दारू साठवून तिची परिसरामध्ये तस्करी केली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने पहाटे चार ते सहाच्या सुमारास पंचांसह संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
गोदामाचे कुलूप उघडून आत तपासणी केली असता, एका पांढऱ्या महिंद्रा बोलेरो वाहनामध्ये ताडपत्रीच्या आडून दडवून ठेवलेला दारूचा मोठा साठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. यात महाराष्ट्रात बंदी असलेली मध्य प्रदेशातील रॉयल स्टॅग व्हिस्की तसेच रुपेश संत्रा आणि रॉकेट संत्रा ब्रँडच्या देशी दारूच्या हजारो बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
रॉकेट संत्रा देशी दारू: १३,००० बाटल्या (मूल्य: ₹५,२४,०००)
रुपेश संत्रा देशी दारू: २,२०० बाटल्या (मूल्य: ₹८८,०००)
रॉयल स्टॅग व्हिस्की: १९२ बाटल्या (मूल्य: ₹५१,८४०)
महिंद्रा बोलेरो वाहन: अंदाजे किंमत ₹६,००,०००
(एकूण १५,३९२ बाटल्यांसह वाहनाची एकत्रित किंमत ₹१२,६३,८४०)
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करून सील करण्यात आला आहे. दुय्यम निरीक्षक सागर अशोक वानखडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
एका औद्योगिक वसाहतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा कोणाच्या आश्रयाने करण्यात आला होता आणि या आंतरराज्यीय रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

























