वणी शहरातील पद्मावती नगरी, काळे ले आउट परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना मोबिन शेख यांच्या घरात एका महिन्यात दुसऱ्यांदा घडली आहे, मागे जवळपास साडे तीन लाखांची चोरी झाली होती,ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील चोरीचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच, त्याच घरात पुन्हा घरफोडी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मोबिन शेख हे तेलंगणात लग्नसमारंभासाठी गेले होते. आज सकाळी घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला आढळला. घरात प्रवेश करताच त्यांनी पाहिलं की संपूर्ण बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. तपासणी केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की घरातून 75 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेलेली आहे.


पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या घरफोड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नागरिकांची मागणी:
पोलिसांनी गस्त वाढवावी.
चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी.
नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा.
पोलिस यंत्रणेनं आपली जबाबदारी पार पाडावी.
एकाच घरात एका महिन्यात दोन वेळा झालेली चोरी म्हणजे सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेवर गदा आली आहे. लोक आपली जीवनभराची पुंजी घरात साठवतात, मात्र अशा घटनांमुळे सामान्य माणूस पूर्णपणे असुरक्षित वाटू लागला आहे.
पोलीस तपासाबाबत जनतेत उत्सुकता: पोलीस प्रशासन आता या प्रकारावर कोणती भूमिका घेते, पुढील तपास कसा करते, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलेलं आहे.

























