सिटी हब मिडिया…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा बिगुल वाजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रणसज्ज झाली आहे. वणी शहरात पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक शिवसैनिकांना अर्ज घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वरोरा रोडवरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात इच्छुकांना अर्ज उपलब्ध असून, २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज सादर करता येतील.
अर्जामध्ये इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक माहिती, सामाजिक व राजकीय अनुभव, पक्षासाठी केलेले उपक्रम, तसेच सोशल मीडियावरील कार्य यासंबंधी तपशील भरावयाचा आहे. आधुनिक राजकारणात समाजमाध्यमांची भूमिका लक्षात घेऊन ही माहिती अनिवार्य करण्यात आली आहे.
राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची छायाप्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अपूर्ण अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व अर्जांची छाननी पक्षाच्या ठरलेल्या निकषांनुसार करण्यात येईल आणि अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल, अशी माहिती वणी शहर प्रमुख विनोद ढूमने, संपर्क प्रमुख राजू तुरणकर, शहर संघटक मनीष बत्रा, शहर समन्वयक अयुब खान पठाण, आणि शहर सचिव अजय चन्ने यांनी संयुक्तपणे दिली आहे.

























