सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहराच्या मुख्य वस्तीत असलेल्या ‘निळकंठ मालती अपार्टमेंट’मध्ये गुरुवारी भल्या पहाटे केंद्रीय यंत्रणेच्या पथकाने अचानक प्रवेश करत तपास मोहीम राबवली. येथील औषध व्यावसायिक रवी येरणे यांच्या सदनिकेत सकाळच्या सुमारास पोहोचलेले पथक हे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ६ च्या सुमारास सुरू झालेले हे शोधसत्र दुपारपर्यंत तब्बल सात तासांपेक्षा जास्त वेळ अखंड सुरू होते.
प्राप्त वृत्तानुसार, दोन इनोव्हा गाड्यांमधून दाखल झालेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी थेट येरणे यांच्या घरात प्रवेश करून विविध कागदपत्रे आणि व्यवहारांची सखोल छाननी सुरू केली. ऐन सकाळच्या वेळी केंद्रीय तपास यंत्रणेने केलेल्या या अनपेक्षित कारवाईमुळे संपूर्ण शहरात तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे.
जिल्ह्यात इतर ठिकाणीही छापासत्र…
केवळ वणीच नव्हे, तर यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास नऊ विविध ठिकाणांवर ईडीच्या स्वतंत्र पथकांनी एकाच वेळी कारवाई सुरू केल्याचे समजते. यामध्ये पुसद, यवतमाळ आणि वणी परिसराचा समावेश आहे. तथापि, या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या चौकशीचा परस्परांशी काही थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कारवाईचे मूळ कारण अद्याप गुलदस्त्यात…
वणीत राबवण्यात आलेली ही मोहीम कोणत्या आर्थिक गैरव्यवहारातून अथवा नेमक्या कोणत्या प्रकरणाशी निगडित आहे, याबाबत यंत्रणेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच तपासणीदरम्यान नेमकी काय कागदपत्रे हाती लागली अथवा काही जप्ती झाली का, यावरही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.तपास अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा पत्रक जारी होईपर्यंत या छाप्याच्या कारणांविषयी कुठलाही अंदाज वर्तवणे अप्रस्तुत ठरेल. यंत्रणेचे निवेदन आल्यानंतरच या कारवाईमागचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

























