सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन; राम शेवाळकर परिसरातील भव्य मैदानावर रंगणार सोहळा, शेतकरी मंदिरात प्रशिक्षण वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद…
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वणी शहरातील बहुप्रतिक्षित आणि नागरिकांच्या पसंतीस उतरलेल्या मनसे गरबा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाचा महोत्सव अधिक भव्य-दिव्य आणि अभूतपूर्व स्वरूपात रंगणार आहे. वणीतील राम शेवाळकर परिसरातील भव्य मैदानावर हा नऊ दिवसीय गरबा महोत्सव या वर्षी सुद्धा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या थेट देखरेख आणि मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत असून, मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. या महोत्सवात बॉलिवूड व टीव्ही विश्वातील नामांकित कलाकारांसह मनसेच्या नेत्या शर्मिला राज ठाकरे (वहिनीसाहेब) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
सेलिब्रिटींची मांदियाळी; कायनात अरोरा आणि मुनमुन दत्ता यांची हजेरी…यंदा वणीकरांच्या उत्साहाला उधाण आणण्यासाठी ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम बॉलिवूड अभिनेत्री कायनात अरोरा आणि घरोघरी लोकप्रिय असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम ‘बबिता जी’ म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता या विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त आणखी एक-दोन आघाडीच्या कलाकारांशी चर्चा सुरू असून, त्यांच्या वेळेनुसार त्यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धकांवर होणार बक्षिसांचा वर्षाव; मोठ्या पुरस्कारांची घोषणा…दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरबा महोत्सवात सहभागी होणाऱ्या आणि अप्रतिम कला सादर करणाऱ्या गरबापटूंसाठी संयोजकांतर्फे भरघोस आणि आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या युवक-युवती, लहान मुले, महिला तसेच सर्वोत्तम वेशभूषा साकारणाऱ्या स्पर्धकांसाठी मोठ्या प्रमाणावर पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे स्पर्धकांमध्ये गरबा खेळण्यासाठी कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
शेतकरी मंदिरात गरबा प्रशिक्षणाचा धडाका…महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबाप्रेमींसाठी स्थानिक शेतकरी मंदिर येथे विशेष गरबा प्रशिक्षण वर्गांचे (क्लासेस) आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी ४:०० वाजता सुरू होणारे हे प्रशिक्षण वर्ग रात्री ९:०० वाजेपर्यंत चालतात. नवनवीन गरबा स्टेप्स आणि तालावर ठेका धरण्यासाठी शहरातील युवक-युवतींसह महिलांचा या वर्गांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, शेकडो नागरिक या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
शर्मिला वहिनीसाहेबांच्या उपस्थितीने महोत्सवाला वेगळी प्रतिष्ठा…मनसे कार्यकर्त्यांचे आदराचे स्थान असलेल्या शर्मिला राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे या महोत्सवाला विशेष कौटुंबिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वहिनीसाहेबांच्या आगमनामुळे सर्व मनसैनिकांमध्ये आणि वणीकरांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था आणि बाहेरगावचे निष्पक्ष परीक्षक…राम शेवाळकर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गरबा खेळणाऱ्या युवक-युवती, महिला, भगिनी आणि पुरुषांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संयोजकांनी विशेष खबरदारी घेतली आहे. मैदानावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सुरक्षेची १०० टक्के खात्री देण्यात आली आहे. गरबा स्पर्धेतील कामगिरीचे पारदर्शक व निष्पक्ष मूल्यांकन व्हावे, यासाठी बाहेरगावच्या तज्ज्ञ परीक्षकांची स्वतंत्र समिती (निर्णय मंडळ) पाचारण करण्यात आली आहे. हे परीक्षक नऊही दिवस गरब्याचे बारकाईने निरीक्षण करून अंतिम निकाल जाहीर करतील.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वणीकरांनी कसली कंबर…दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वणीतील या नऊ दिवसीय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण वणीकरांनी कंबर कसली आहे. यामध्ये विशेषतः महिला, भगिनी आणि बालगोपाळांचा सहभाग लक्षणीय ठरत आहे. शिवजयंतीच्या माध्यमातून लहान मुलांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचा जसा प्रयत्न असतो, त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, भक्ती आणि कौटुंबिक सौहार्द जपण्याचा आयोजकांचा मानस आहे. पारंपरिक वेशभूषेत थिरकणाऱ्या माता-भगिनींमुळे मैदानात साक्षात देवी अवतरल्याचा भास होतो, अशी भावना व्यक्त करत राजू उंबरकर आणि सर्व सहकाऱ्यांनी वणीकरांना या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

























