सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
संघर्षातून घडलेले चाणाक्ष नेतृत्व! वणी भाजप शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी यांचा आज वाढदिवस; ऐतिहासिक विजयानंतर आगामी निवडणुकांवर नजर…
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अत्यंत खडतर संघर्षातून, सामाजिक बांधिलकीतून आणि धडाडीच्या नेतृत्वाच्या जोरावर वणी शहराच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारे अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांचा आज, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी वाढदिवस आहे. आपल्या अभ्यासू वकिली व्यवसायासोबतच राजकारणातही अत्यंत चाणाक्ष व कुशल रणनीतीकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, आज वणी शहरात त्यांच्याकडे भाजपचे सक्षम आणि लोकप्रिय ‘युवा नेतृत्व’ म्हणून पाहिले जाते.
संघर्षातून घडलेला जीवनप्रवास आणि वकिलीतील ठसा…७ ऑक्टोबर १९८० रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अॅड. निलेश चौधरी यांचे वडील वणी पंचायत समितीत ओरशीअर (Orseer) म्हणून कार्यरत होते. पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या निलेश चौधरी यांना ताई व भावाचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय जीवनात एन.सी.सी.च्या (NCC) माध्यमातून देशप्रेमाची रुजलेली भावना आणि महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी (UR) म्हणून केलेल्या कामातून त्यांच्यातील नेतृत्वगुण उजळून निघाले.
LL.B. व LL.M. पूर्ण केल्यानंतर २००४ सालापासून त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केले. अभ्यासू वृत्ती, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी कायदे क्षेत्रात स्वतःचे नामांकित स्थान निर्माण केले.
समाजकारणाचा भक्कम पाया: ‘रॉयल फाऊंडेशन’…वकिली व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी रोटरी क्लब आणि त्यानंतर स्थापन केलेल्या ‘रॉयल फाऊंडेशन’च्या माध्यमातून गरजू, दुर्बल घटकांसाठी आरोग्य व विविध मदतकार्यांचे उपक्रम राबवले. या समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी वणीत कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मोठे जाळे विणले.
पहिलीच राजकीय कसोटी आणि नगरपालिकेत ऐतिहासिक विजय…
राजकारणाचा कोणताही प्रदीर्घ अनुभव नसताना आणि एक प्रकारे नवखे असतानाच पक्षाने त्यांच्यातील संघटन कौशल्य ओळखून त्यांच्यावर वणी भाजप शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिली मोठी कसोटी होती ती म्हणजे ‘वणी नगरपालिका निवडणूक’.
भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली अॅड. निलेश चौधरी यांनी ही निवडणूक मोहीम फत्ते केली. त्यांच्या सूक्ष्म नियोजन कौशल्यामुळे, अचूक मीडिया मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या नव्या दमाच्या टीममुळे भाजपने नगराध्यक्षासह तब्बल १९ जागांवर दणदणीत विजय मिळवून नगरपालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. “फक्त आणि फक्त भाजपच शहराचा खरा विकास करू शकते,” हे वणीच्या जनतेला पटवून देण्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले.
वरिष्ठांची मर्जी आणि निष्ठावंत कार्यकर्ता…पक्षाचा कोणताही कार्यक्रम वा आंदोलन असो, सर्वांत आधी हजर राहणारे आणि कनिष्ठ ते वरिष्ठ सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे वरिष्ठ नेत्यांची मर्जी त्यांनी संपादन केली असून पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या कामगिरीवर भलतेच खूश आहेत. नगरपालिकेच्या ऐतिहासिक यशानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही त्यांच्या या रणनीतीचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
“भाजपची घोडदौड कायम ठेवणार” – वाढदिवशी संकल्प–आपल्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त करताना अॅड. निलेश चौधरी यांनी पक्षाची विजयाची घोडदौड अशीच कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे.
“भारतीय जनता पार्टी हा लोकांसाठी झटणारा आणि विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. येणाऱ्या काळात वणी शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलून सर्वसमावेशक विकास केला जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कनिष्ठ ते वरिष्ठ सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेले, निष्ठावंत संघटक, अभ्यासू वकील व समाजसेवक अॅड. निलेश चौधरी यांना ‘सिटी हब मीडिया’ कडून वाढदिवसाच्या आणि भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस उदंड शुभेच्छा!

























