सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मोबाईलमध्ये त्यांची बातमी धडकली की प्रशासकीय वर्तुळात आणि नेत्यांच्या गोटात अनेकांच्या हृदयाची स्पंदने वाढतात. आज कोणाची पोलपट्टी उघड झाली? आज बातमीच्या माध्यमातून कोणाची खरडपट्टी निघाली? अशी धाकधूक निर्माण करणारे नाव म्हणजे या परिसरातील निर्भीड पत्रकार अजय कंडेवार…
शिक्षकी पेशासोबत लोकजागृतीचे व्रत… अजय कंडेवार हे मूळचे शिक्षक असून भावी पिढी घडवण्याचे कार्य अविरत करत आहेत. शिक्षकी पेशाच्या माध्यमातून समाज घडवत असतानाच, त्यांनी आपल्या लेखणीच्या ताकदीने जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे व्रतही स्वीकारले आहे. शिक्षण क्षेत्रातील संयम आणि पत्रकारितेतील धारदार बाणा यांचा उत्तम मेळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
माफिया असो वा सत्ताधारी, कोणाचीही गय नाही… परिसरामध्ये अजय कंडेवार यांची ओळख एक निष्पक्ष आणि सडेतोड पत्रकार म्हणून आहे. सर्वसामान्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडणे, झोपलेल्या प्रशासनाला जागे करत धारेवर धरणे आणि वेळप्रसंगी बड्या नेत्यांची पोलखोल करणे हा त्यांचा स्वभावविशेष आहे. समोर कोणताही माफिया असो वा वजनदार व्यक्ती, कसल्याही दबावाला बळी न पडता ते सत्य परिस्थिती थेट जनतेसमोर मांडतात. त्यांच्या या निर्भीड लेखणीमुळे भ्रष्ट व्यवस्थेला चांगलाच चाप बसतो आणि सर्वसामान्यांना न्यायाची नवी उमेद मिळते.
पत्रकारितेत निर्माण केला वेगळा दबदबा… कोणालाही न घाबरता थेट वस्तुस्थिती मांडण्याच्या वृत्तीमुळे आज अजय कंडेवार यांचे पत्रकारिता क्षेत्रातील नाव एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. त्यांच्या बातम्यांचा परिसरात एक वेगळाच दरारा आणि प्रभाव पाहायला मिळतो.
लोकहिताची ही निर्भीड लेखणी अशीच अविरत चालत राहो, सिटी हब मिडिया वणी तर्फे अजय कंडेवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

























