सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
राजधानी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या घटनेचे पडसाद आता वणीतही उमटले आहेत. या घटनेच्या विरोधात वणी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीने एकत्र येत तीव्र आक्षेप नोंदवला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, लोकशाहीत विरोधकांना आपली भूमिका मांडण्याचा आणि जनतेच्या मुद्द्यांवर शांततेत आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारच्या घटना घडणे हे संविधानाने दिलेल्या अधिकारांवर आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हक्कांचे रक्षण करावे, सामान्य नागरिकांचा आवाज दाबला जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे आवाहन राष्ट्रपतींना करण्यात आले आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा वणी काँग्रेसने व्यक्त केली.
यावेळी तालुकाध्यक्ष विकेश पानघाटे, शहराध्यक्ष जय आबड यांच्यासह संजय खाडे, टिकाराम कोंगरे, डॉ. कावडे, ओम ठाकूर, वंदना आवारी, डेविड पेरकावार, फरीद शेख, सुधीर खंडाळकर, जगदीश चौधरी, राजेश कोरडे, करुणा कांबळे, अल्का मोवाडे, काजल शेख, रामदास कुचणकर, अनिल ठाकुरवार, सुरेश बनसोड, अशोक नागभीडकर, सुरज पुल्लेवार, रोहित मालेकर, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर, निखिल मडावी, तेजराज बोढे, नीलिमा काळे, सतीश पुसदकर, प्रदीप खेकारे, अविनाश पानघाटे, पंजाब कुमरे, प्रा. वऱ्हाटे, रवि कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























