सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील हॉटेल आणि बिर्याणी सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अवैध गोवंशीय मांस विक्रीवर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे। १८ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वणी शहरातील एकूण पाच हॉटेलांमध्ये एकाच वेळी अचानक छापे टाकून झडती घेतली। त्यापैकी तीन हॉटेलांमध्ये सुमारे १९ हजार ८०० रुपयांचे ६६ किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुठे काय कारवाई झाली?
१. हॉटेल मदिना (सुजाता टॉकीजसमोर, वणी):
सकाळी अंदाजे ९:३० वाजता पंचांसमक्ष व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला। यावेळी हॉटेलच्या फ्रिजमधून १८ किलो कच्चे आणि टोपलीमधून २० किलो असे एकूण ३८ किलो गोवंशीय मांस (किंमत अंदाजे ११,४०० रु.) जप्त करण्यात आले। याप्रकरणी चालक हबीब खान बिस्मिल्ला खान (वय ५३, रा. साई नगरी, वणी) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे।
२. सुलतान बिर्याणी हॉटेल (एकता नगर, वणी):
दुपारी १२:३० वाजता एकता नगर येथील या हॉटेलवर छापा टाकण्यात आला। किचनमधून ५ किलो कच्चे आणि कुकरमधून ४ किलो शिजवलेले असे एकूण ९ किलो गोवंशीय मांस (किंमत अंदाजे २,७०० रु.) हस्तगत करण्यात आले। चालक मोहम्मद सिद्दीक हाजी हबीब रंगरेज (वय ४७, रा. विराणी टॉकीजजवळ, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे।
३. ताज बिर्याणी हॉटेल (एकता नगर, वणी):
पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके यांच्या फिर्यादीनुसार येथे कारवाई करण्यात आली। या ठिकाणाहून १९ किलो संशयित गोवंशीय मांस (किंमत अंदाजे ५,७०० रु.) जप्त करण्यात आले। हॉटेल चालक साजिद खान शमशेर खान (वय ४९, रा. मदिना मस्जिदजवळ, वणी) याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।
तपासाची व्याप्ती आणि पार्श्वभूमी…
कारवाईदरम्यान जप्त मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रयोगशाळा तपासणीसाठी (Lab Testing) पाठवण्यात आले असून, नाशवंत मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी वणी नगर परिषदेचे सहकार्य घेण्यात आले आहे.
वणी परिसरात अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. आठवडाभरापूर्वी गांधी चौकात ६० किलो तर पांढरकवडा येथे तीन घरांमधून सुमारे ९०० किलो मांस जप्त करण्यात आले होते. पांढरकवडा व चंद्रपूर मार्गे हा पुरवठा शहरात पोहोचत असल्याची चर्चा असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आणि वाहतुकीचे मार्ग कोणते, याचा मुळापासून छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
पोलीस पथकाची कामगिरी…सदर यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पथकात सपोनि दत्ता पेंडकर, गजानन राजमल्लु, पोउपनि धनराज हाके, सागर इंगळे, हवालदार सुनील खंडागळे, अजय डोळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अंमलदार किशोर आडे, मिलींद दरेकर, रजनीकांत मडावी, सुनील पैठणे, आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होते आणि चालक नरेश राउत यांचा सहभाग होता।

























