Nagpur News: विदर्भात शाळा (Vidarbha School) सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 23 जूनला शाळा बंद राहणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय. त्यामागचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने 23 जूनला शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 23 जूनला एक दिवस विदर्भातील सर्व शाळा (Schools in Vidarbha) बंद ठेऊ. असा निर्धार आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने (Maharashtra Rajya Shikshan Sanstha Mahamandal) घेतल्याची माहिती सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शिक्षण विभागाचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लंघन करताय
आम्ही 23 जूनला शाळा सुरू करणार नाही, हे शासनाला आधीच कळविले आहे. कारण उच्च न्यायालयाचा आधीचा आदेश आहे की, 26 जूनच्या आधी विदर्भातील शाळा सुरू करू नये. असे असून देखील जूनला शाळा सुरू करण्याचा निर्देश देऊन शिक्षण विभागाचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लंघन करत आहे. आमच्या विविध योजनांसह आरटीई योजनेअंतर्गत 2400 कोटी शासनाकडे थकीत असताना आम्हाला या वर्षी फक्त 240 कोटी रुपये दिलेले आहे. त्या शिवाय मालमत्ता करातून शैक्षणिक संस्थांना सूट देणे, अनुदानित शाळांना निवासी वीज दराने वीज पुरवठा करणे, सौर ऊर्जेची सुविधा विनामूल्य द्यावी, अशा अनेक मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत.
तर पुढील महिन्यात आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार
आमचे हे सर्व आर्थिक प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत आमचा शासनाची लढा सुरू राहील आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही विदर्भातील शाळा 23 तारखेला न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 जून रोजी किती शाळा बंद राहणार तो आकडा आम्ही सांगू शकत नाही, मात्र महामंडळाशी जोडलेला सर्व शाळा याच्यामध्ये सहभागी होतील, असा विश्वास असल्याचे शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले. शाळा उघडल्या नाही तर सरकार आमच्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करेल. जर आमचे मागण्यांकडे लक्ष घातले नाही तर पुढील महिन्यात आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा विचार करत आहोत. असेही फडणवीस म्हणाले.