Tejashwi Ghosalkar: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्याने आणखी एक माजी नगरसेवक ठाकरे गटापासून दूर जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हा अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सद्नभावनेनं हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक होते. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती, त्या जागेवर अभिषेकची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना संचालकपद दिले गेले आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांना संचालक केलं गेलं आहे. त्यामुळं भाजपमध्ये जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला का? अशी चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून संचालकपद मिळावे म्हणून तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील होत्या. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष प्रवीण दरेकर काय म्हणाले?
दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यानतंर बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेऊन तेजस्विनी घोसाळकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जागा रिक्त असल्याने ती भरणं क्रम प्राप्त होत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मराठी माणसं, मराठी मतदार त्यांच्याकडे आहे या भ्रमातून त्यांनी बाहेर यावे. भारतीय जनता पक्षाला मिळालेला जनाधार हा पाकिस्तानी नाही तर मुंबईतील मराठी माणसाने दिला.