सातारा/पुणे : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याबद्दल सातारामधील एका महिलेला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती . त्या महिलेने दिल्लीतील अशोक छोटूलाल शर्मा या ज्योतिषाच्या सांगण्यावरून जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याचा दावा करत सातारा पोलिसांनी अशोक शर्माला दिल्लीतून अटक केली आहे. अशोक शर्माला सातारा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याशी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आणखी कोण कोण संपर्कात होते याचा तपास पोलीस करणार आहेत.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणाला आणखी एक नाट्यमय वळण मिळालंय.सातारा पोलिसांनी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातून अशोक छोटूलाल शर्मा या ज्योतिषाला अटक केली आहे. सातारा पोलिसांनी मार्च महिन्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून चारुशीला मोहिते नावाच्या महिलेला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी चारुशीला मोहितेचा मोबाईल तपासाला असता त्या जानेवारी महिन्यापासून व्हॉट्सअप चॅट, व्हिडीओ आणि ऑडिओ कोलच्या माध्यमातून अशोक शर्माशी संपर्कात असल्याचं समोर आलं. चारुशीला मोहिते यांनी शर्मासोबतचे चॅट आणि कॉलचे रेकॉर्ड डिलीट करून टाकले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने पोलिसांनी तो डेटा पुन्हा मिळवला असता अशोक शर्माने चारुशीला मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागायला सांगितल्याचं समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणंय .
अशोक शर्मा ज्योतिषी आहे आणि मांत्रिक देखील. दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात त्याच कार्यालय असून त्याने ज्योतिष विद्येची पदवी देखील घेतलीय. देशातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होत असतो. अशाच एका कार्यक्रमात जानेवारी महिन्यात चारुशीला मोहितेंची शर्मासोबत ओळख झाली. त्यानंतर चारुशीला मोहितेंनी शर्माकडे सल्ला मागण्यास सुरुवात केली असता शर्माने मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यास सांगितलं.
जयकुमार गोरे यांच्यावर 2017 साली सर्वात आधी चारुशीला मोहितेंकडून लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता . त्यावेळी आमदार असलेल्या जयकुमार गोरेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता . मात्र दोघांमध्ये न्यायालयात तडजोड झाली होती . मात्र, चारुशीला मोहितेंनी पुन्हा यावर्षी मार्च महिन्यात जयकुमार गोरेंवर आरोप केल्याने खळबळ उडाली होती.राज्याच्या विधिमंडळात हे प्रकरण गाजलं होतं . त्यानंतर चारुशीला मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंच्या सहकाऱ्यांकडून एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात अटक केली होती.
या प्रकरणात जयकुमार गोरेंच्या राजकीय विरोधकांवर चारुशीला मोहितेंना मदत केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला . पोलिसांनी त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर , प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घारगे यांची चौकशी केली तर तुषार खरात या पत्रकाराला अटक केली. आता ज्योतिषी असलेल्या अशोक शर्माच्या संपर्कात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे यापैकी कोणी होते का याचा तपास सातारा पोलीस करणार आहेत.
मंत्री जयकुमार गोरेंशी संबंधित या प्रकरणात सुरुवातीपासून राजकीय आरोप – प्रत्यारोप होत आलेत . अनेक नाट्यमय घडामोडी या प्रकरणात पाहायला मिळाल्यात .आता याप्रकरणात एका मांत्रिक कम ज्योतिषाची देखील एंट्री झालीय. आता या अशोक शर्माच्या चौकशीतून आणखी कोण कोणाचं भविष्य घडतं किंवा बिघडतं हे सातारा पोलिसांच्या पुढच्या काही दिवसांमधील कारवाईतून स्पष्ट होणार आहे.