Supriya Sule : नुसता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरुन उपयोग नसतो, तर त्यांचे विचार घेतले पाहिजेत असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा विचार चव्हाण साहेबांनी मांडला. त्यांनी कायम दुसऱ्याला सत्ता दिली माझ्यासोबत तुम्ही देखील सत्तेत राहा असे ते म्हणाले. दुर्दैव आहे पण आज तसं होताना आता दिसत नाही. निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं की नाही याचा आत्मचिंतन करावं असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला. रात्री पीडीसीसी बँक उघडी कशी? याचे उत्तर मला पाहिजे. ही बँक कोणाची मक्तेदारी नाही असेही सुळे म्हणाल्या.
इतकी चांगली बँक रात्री 11 वाजता उघडी का?
इथलं सीसीटीव्ही फुटेज यंत्रणेंना मिळालं पाहिजे. तुम्हीच नियम करणार तुम्हीच नियम मोडले तर याला लोकशाही म्हणत नाहीत याला दडपशाही म्हणतात असे सुळे म्हणाल्या. आपली इतकी चांगली बँक आहे तर रात्री 11 वाजता बँक उघडी का? कोण तिथे गेलं होतं? माळेगावच्या सभासदांचा बँकेचा काय संबंध तुमच्या सगळ्यांची नाव तिथे होती माझेही असेल असे सुळे म्हणाल्या. या बँकेची एसआयटी कमिटी नेमा, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी सुळे यांनी केली. मोदी म्हणतात बँकेचा व्यवहार पारदर्शक राहिला पाहिजे मग पीडीसीसी बँक मोदींच्या विरोधात का काम करते? याची चौकशी झाली पाहिजे. जर चौकशी झाली नाही तर मी पार्लमेंटमध्ये याची मागणी करणार असल्याचे सुळे म्हणाल्या. मी कोणावरही आरोप करत नाही असे सुळे म्हणाल्या.
आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्तीशी लढा, गरिबांशी लढून काय फायदा?
अमिताभ बच्चनचा पिक्चर फ्लॉप जातो अमिताभ बच्चन काय घरात बसतो का? केंद्रातले आणि राज्यातले प्रश्न असतील ते सगळे आपण सोडवू असेही सुळे म्हणाल्या. बारामती फळविक्रेत्यांच्या फळांच्या टोपल्या सगळ्या फेकून दिल्या आहेत. बारामती सुंदर झाली पाहिजे परंतु जेवढा श्रीमंतांचा त्यामध्ये हात आहे तेवढाच गरीबांचा देखील हात आहे. हे चालणार नाही. नगर पालिकेला समान फेकून देण्याचा अधिकार नाही असेही सुळे म्हणाल्या. जर सर्वसामान्यांचे फेकून देत असाल तर पीडीसीसीमध्ये असं झालं का? लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्तीशी लढा, गरिबांशी लढून काय फायदा? असा सवाल देखील सुळेंनी केला.
आजपासून रात्र वैऱ्याची आहे
आज आणि उद्या फक्त लक्ष ठेवा मोबाईलचा व्हिडिओ चालू ठेवा. कशाचंही दर्शन झालं तर त्याचं व्हिडिओ काढा. पांडुरंगाचेही दर्शन होऊ शकतं असे सुळे म्हणाल्या. आजपासून रात्र वैऱ्याची आहे. खरंच वैऱ्याची आहे. दरवाजा वाजेल लोक येतील जातील जो येईल त्याला नमस्कार करा आणि व्हिडिओ चालू ठेवा असेही सुळे म्हणाल्या. समता ही फक्त शिक्षणातून मिळते, बळीराजा सहकार बचाव पॅनलला संधी द्या हीच विनंती करण्यातसाठी मी आले आहे असे सुळे म्हणाल्या. आज आणि उद्या फक्त कॅमेरे चालू ठेवा ही झोपायची वेळ नाही लढाईची वेळ आहे असेही सुळेम्हणाल्या.
फक्त तुतारी लक्षात ठेवा, माणूस 24 तारखेला वाजवायला येईल : युगेंद्र पवार
जे नवीन सभासद जोडले गेलेले आहेत ते शरद पवारांनी सूचना केल्यानंतरच जोडले गेलेले आहेत, तसे प्रोसेटिंग देखील त्या ठिकाणी आहे. मात्र, पुढच्या पॅनलची लोक काहीही सांगतात असे म्हणत नाव न घेता युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. शरद पवारांचे सहकारात मोठे योगदान आहे. स्वतः चा एकही कारखाना ताई आणि साहेबांनी काढला नाही. सगळी सत्ता जर एकाच हातात गेली तर लोकशाहीसाठी ते घातक असतं. हे सगळे आपले संचालक उत्तम कारखाना चालू शकतील असे युगेंद्र पवार म्हणाले. आपलं चिन्ह तुतारी आहे, आता फक्त तुतारी लक्षात ठेवा, माणूस 24 तारखेला वाजवायला येईल असेही युगेंद्र पवार म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार बचाव पॅनेलची सांगता सभा माळेगाव येथे होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडते आहे. यावेळी युगेंद्र पवार बोलत होते.