वणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजू डफ उर्फ राजेश वामनराव डफ (वय ५४) यांचे बुधवारी दुपारी दुर्दैवी अपघातात निधन झाले. काही कामानिमित्त सकाळी आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून झरीजामणी येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना दुपारी सुमारे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास झरीजामणी–शेकापूर मार्गावरील मुच्ची गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला.

दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला फेकली गेल्याने ते गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पाटण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
स्वभावाने अत्यंत मनमिळावू आणि मोठ्या मित्रपरिवारात लोकप्रिय असलेले राजू डफ यांची नुकतीच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

























