सिटी हब मिडिया वणी…
घोंसा कोळसा खाण परिसरात अपघात; सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी अंत…
घोंसा कोळसा खाण क्षेत्रात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान घडलेल्या भीषण अपघातात एका सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. बांधकाम सुरू असलेल्या नाल्यावरून जात असताना अंधारात अंदाज न आल्याने ते थेट खोल खड्ड्यात कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यशपाल बुरबुरे (वय ४३) असे या अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते घोंसा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते व डब्ल्यूसीएलच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रात्रीची ड्युटी पूर्ण करून ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना, कुम्भारखनी डब्ल्यूसीएल कार्यालयासमोरील नाल्यावर पुलाचे काम सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात न आल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.
पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कोणतीही पुरेशी सूचना फलक अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
यशपाल बुरबुरे हे स्वभावाने अत्यंत मनमिळावू होते. मूळचे राजूर कॉलरी येथील रहिवासी असलेले बुरबुरे नंतर वणी येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या सौम्य वागणुकीमुळे परिसरात त्यांचा मोठा परिचय होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक व सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

























