सिटी हब मिडिया वणी…
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा मजबूत करणार – किरण विश्वासराव नांदेकर…

राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार स्वर्गीय विश्वासराव नांदेकर यांच्या पत्नी किरण विश्वासराव नांदेकर यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, शिवसेना व आपल्या भावी राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने राज्यात घवघवीत यश मिळवले असल्याचे नमूद केले.
किरण नांदेकर म्हणाल्या की, “एकनाथराव शिंदे हे राज्याचे यशस्वी व लोकाभिमुख नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विधानसभा निवडणुका असोत वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून राज्यात शिवसेनेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.”
यावेळी त्यांनी एक भावनिक आठवणही सांगितली. “जेव्हा स्वर्गीय विश्वासराव नांदेकर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. डॉक्टरांना विश्वासराव यांची संपूर्ण काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. एका अभिभावकाप्रमाणे त्यांनी विश्वासराव यांची काळजी घेतली. त्या काळातील त्यांची भूमिका आणि संवेदनशीलता आम्ही कधीही विसरू शकत नाही. यासाठी मी आजन्म एकनाथराव शिंदे यांची ऋणी राहीन,” असे भावनिक उद्गार किरण नांदेकर यांनी काढले.
स्वर्गीय विश्वासराव नांदेकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचावी, हेच त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आता सक्रिय राजकारणात उतरले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याची ग्वाही किरण नांदेकर यांनी दिली.
“येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत वा अन्य निवडणुका, शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. शिवसेना अधिक मजबूत कशी होईल, संघटन तळागाळापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधून काम सुरू आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अखेर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करत, “एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे विजयाचे घोडदळ असेच अविरत सुरू राहावे,” अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
एकूणच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत किरण ताई नांदेकर यांनी सक्रिय राजकारणाची ठोस सुरुवात केली असून वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या राजकीय हालचालींना नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

























