सिटी हब मिडिया वणी…
वणी शहरातील रंगारीपुरा परिसरात घरामध्ये सुरू असलेल्या पैशांच्या जुगारावर वणी पोलिसांनी कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३५ ते ४.०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस स्टेशन वणी येथील सपोनी प्रियांका चौधरी (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक नारायण उके यांच्या रंगारीपुरा येथील राहत्या घरात काही व्यक्ती ५२ पत्त्यांचा संच लावून पैशांवर हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ धाड टाकली असता घरात जुगार सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ५२ पत्त्यांचा संच तसेच १,६५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय उपस्थित आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली असता त्यांच्याकडून विविध रकमेची रोकड जप्त करण्यात आली. या सर्वांची मिळून एकूण ७,२२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणात विवेक नारायण उके (रा. रंगारीपुरा), शेख रफिक शेख मेहबुब (रा. पंचशील नगर), अशोक नामदेव नागदिवे (रा. फाले लेआउट), गणपत भिकाजी वाढई (रा. आवारी लेआउट), प्रकाश पुंडलीक कोंडमवार (रा. सरोदे चौक), सुमित सुभाषराव कोनप्रत्तीवार (रा. प्रगती नगर) आणि सिद्धार्थ विवेक चवरे (रा. सेवानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईनंतर संध्याकाळी ७.२६ वाजता पोलीस स्टेशन वणी येथे अधिकृत नोंद करण्यात आली. पुढील तपास NPC/2363 विशाल राठोड हे करीत आहेत.
वणी शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

























