सिटी हब मिडिया वणी…
पैशांच्या वादातून निर्माण झालेल्या वैमनस्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे. वणी शहरातील संजय ऑटोमोबाईल समोर बुधवारी रात्री मित्रानेच मित्रावर लोखंडी सळईने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मल्लेश संजय नेरकुंटलावार (२४, रा. दामलेफैल) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
पोलिस माहितीनुसार, मृत मल्लेश आणि आरोपी मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे (२६, रा. पळसोनी) हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. काही दिवसांपूर्वीच ते एकत्र सहलीलाही जाऊन आले होते. मात्र, मल्लेशने मंगेशला दिलेले ७,००० रुपये परत मागितल्याने दोघांमध्ये वितुष्ट आले होते. याच कारणावरून १८ फेब्रुवारीच्या दुपारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
रात्री गाठले आणि घात केला…
बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास बोकडे पेट्रोल पंप परिसरातील संजय ऑटोमोबाईल समोर मंगेशने मल्लेशला गाठले. संतापलेल्या मंगेशने आपल्याजवळील लोखंडी सळईने मल्लेशच्या डोक्यावर भीषण हल्ला चढवला. हा वार इतका गंभीर होता की, मल्लेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

पोलीस कारवाई आणि अटक
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सचिन वांढरे आणि मृताचा भाऊ राजेश नेरकुंटलावार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मल्लेशला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात सपोनी प्रियंका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मंगेश उर्फ भुऱ्या डाखरे याला अटक केली आहे.

























