सिटी हब मिडिया वणी…
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ भाषणाबाजी न करता, प्रत्यक्ष उन्हातान्हात राबणाऱ्या हातांना मदतीचा आधार देत वणीत
संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. धनोजे कुणबी महिला विकास संस्था आणि शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता संजय खाडे यांच्या पुढाकाराने शहरातील कष्टकरी महिला, गरजू रुग्ण आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करत फळवाटप करण्यात आले.

शिवरायांना अभिवादन करून मोहिमेला सुरुवात… कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आला. स्त्री शक्तीचा जागर करतानाच, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उन्हातील सावली: कष्टकरी भगिनींशी संवाद…
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता भाजीपाला विक्री करणाऱ्या, रस्त्याच्या कडेला बसून छोटे व्यवसाय करणाऱ्या आणि प्रपंचाचा गाडा ओढणाऱ्या श्रमजीवी महिलांशी सौ. संगीता खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट संवाद साधला. या भगिनींना फळे आणि थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून त्यांच्या कष्टाची दखल घेण्यात आली.
रुग्णालय आणि पोलीस ठाण्यात सन्मान…
आरोग्य सेवा: ग्रामीण रुग्णालय आणि नगराळे हॉस्पिटलमधील प्रसूती झालेल्या मातांना पौष्टिक फळे आणि पाणी देण्यात आले.
खाकीचा गौरव: पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शाल आणि पाणी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
“स्वतःच्या कष्टावर संसार उभा करणाऱ्या महिला हे समाजाचे खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे मत सौ. संगीता संजय खाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
यांची लाभली उपस्थिती…
या उपक्रमात धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. साधनाताई गोहोकार, समिती सल्लागार किरणताई देरकर यांच्यासह वंदनाताई आवारी, अर्चनाताई बोधाडकर, कविताताई चटकी, साधनाताई मत्ते, स्मिताताई नांदेकर, प्रमिलाताई पावडे, हर्षाताई सपाट, वंदनाताई बल्की, कांचनताई देरकर, रिताताई पहापळे, अर्चनाताई पिदुरकर, वर्षाताई खाडे, शामाताई तोटावार, सीमाताई खाडे, सविताताई आवारी, सुरेखाताई ढेंगळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वस्तूंपेक्षाही आपुलकीच्या दोन शब्दांनी आणि सन्मानाने या महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान या उपक्रमाचे खरे यश मानले जात आहे.

























