शांततेसाठी ओळखला जाणारा वणी तालुका सध्या धक्कादायक घटनांनी हादरला आहे. मागील तीन दिवसांत दोन खून आणि आता जंगलात मानवी हाडांचा सापळा आढळल्याने तालुक्यात गुन्हेगारीचे सावट दाटून आले आहे.
भालर मार्गालगत एमआयडीसी जवळील झुडपात गुरुवारी दुपारी काही गावकऱ्यांना हाडांचा सापळा आढळला. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली कवटी, हात व शरीराची हाडे पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी साडीचे अवशेषही दिसल्याने हा सांगाडा स्त्रीचा असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी पंचनामा करत सांगाडा जप्त करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
🔎 तपासातील मोठा प्रश्नचिन्ह
हा सांगाडा नेमका कोणाचा?
तो खून, आत्महत्या की गुप्तपणे पुरलेला मृतदेह आहे?
या सगळ्यांचा उलगडा करणे पोलिसांसाठी मोठे कोडे ठरत आहे.
🚨 गुन्ह्यांची साखळी चिंताजनक
अवघ्या तीन चार दिवसांपूर्वीच मंदर येथे मांडवकर बियरबारच्या मागे देवराव गुंजेकर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळाला. डोक्यावर व चेहऱ्यावर खोल जखमा होत्या.
तर २० ऑगस्टला गणेशपुर येथे जुगाराच्या वादातून एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.
आणि मग दुपारीच जंगलात हाडांचा सापळा…
ही सलग तीसरी घटना उघड झाल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांपुढे आव्हान
मागील घटनांचा उलगडा व्हायचा बाकी असतानाच मानवी सांगाड्याचा गूढ निर्माण झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

























