साडेतीन तास वाहतुकीची कोंडी, वेकोलिच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे…
वणी खाण परिसरातील रस्त्यांची दुरवस्था व इतर मूलभूत समस्या याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (25 ऑगस्ट) काँग्रेस पक्षाने उकणी खाण रोडवरील बसस्टॉप जवळ विराट चक्काजाम आंदोलन छेडले. पहाटे 6 वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले.



सकाळी शेकडो ग्रामस्थांसोबत वेकोलि कर्मचारी व काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने आंदोलकांची संख्या 300 च्या वर गेली. घोषणाबाजीसह आंदोलकांनी खाणीकडे जाणारा रस्ता रोखल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अखेर वेकोलि प्रशासनाने समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

“आश्वासन प्रत्यक्षात न उतरल्यास मोठे आंदोलन” – संजय खाडे
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “वेकोलि प्रशासनाने आश्वासन त्वरित पूर्ण केले नाही, तर यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल. नागरिकांच्या हक्कासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील.”
आंदोलनावेळी काँग्रेसचे प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, वासूदेव विधाते, सुनीलवरारकर, सतीश खाडे, बंडू बोंडे, बंडू गिरटकर, सुरेश ढपकस, प्रभाकर खोब्रागडे आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलन यशस्वीपणे पार पडल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले…

























