वणी: शहरातील न्यू ज्योती बारमध्ये शनिवारी (13 सप्टेंबर) दुपारी 1.30 वाजता आठ ते दहा महिलांनी प्लास्टिक पाईप आणि लाकडी दांडक्यांसह प्रवेश करत तोडफोड केली. या हल्ल्यात बारचे मालक मनोज उरकुडे आणि मॅनेजर आशिष खाडे जखमी झाले. याप्रकरणी वणी पोलिसांनी चार महिलांसह आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची सुरुवात शुक्रवारी (12 सप्टेंबर) सायंकाळी 6 वाजता झाली, जेव्हा शेखर अशोक दुर्गमवार नावाचा व्यक्ती आपल्या मित्रासह बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. दारू पिल्यानंतर त्याने बिल न भरता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बार कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. शेखरने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले, ज्यांनी बिल भरले. मात्र, जाताना त्याने बार मालकाला “उद्या बघ, तुला आयुष्यभर लक्षात राहील” अशी धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी, शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास, आठ ते दहा महिलांनी बारमध्ये प्रवेश केला. त्यांनी बार मालक मनोज उरकुडे यांच्यावर शिवीगाळ करत हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात तिखट पावडर फेकली, ज्यामुळे त्यांना काही काळ अंधत्व आले. त्यानंतर त्यांनी मारहाण करत त्यांना खाली ओढले. या हल्ल्यात मनोज उरकुडे यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर मार लागला.

दरम्यान, काउंटरवर बसलेले मॅनेजर आशिष खाडे यांनाही महिलांनी लक्ष केले. त्यांच्यावर काचेचे ग्लास फेकल्याने तेही जखमी झाले. या घटनेनंतर मनोज उरकुडे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूर कॉलरी येथील 3 महिला, वरोरा येथील 1 महिला आणि इतर 4 असे एकूण 8 जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 नुसार कलम 189(2), 191(2), 190, 118(1), 115(2), 296, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

























