आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने बाजोरिया लॉन वणी येथे नुकताच भव्य कार्यगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात फेडरेशनचे नेते कॉ. नामदेव कन्नाके (अमरावती झोन अध्यक्ष) व कॉ. कृष्णा भोयर (सरचिटणीस) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.

सोहळ्याला अध्यक्ष म्हणून कॉ. मोहन शर्मा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. एन. वाय. देशमुख, कॉ. विजय ठाकरे, कॉ. महेश जाधव, कॉ. राजेश तिवारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यगौरव सोहळा आणि प्रवेश
कॉ. कृष्णा भोयर व कॉ. नामदेव कन्नाके यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पहार घालून यवतमाळ सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी गौरव केला. या वेळी मोठ्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमला.

याच कार्यक्रमात पारेषण व वितरण कंपनीतील नव्याने लागलेले ३१ वीज कामगार फेडरेशनमध्ये दाखल झाले. नवीन कामगारांनी विविध मागण्या लेखी स्वरूपात संघटनेकडे सादर केल्या असून त्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले.
महावितरण कंपनीची पुनर्रचना म्हणजे कामगार कपात
आपल्या भाषणात कॉ. मोहन शर्मा म्हणाले की, “महावितरण कंपनीत होणारी पुनर्रचना म्हणजे कामगार कपातीचा मार्ग. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार असून संघटनेने या निर्णयाचा तीव्र विरोध करावा.”
त्यांनी पुढे सांगितले की, सन १९६७ मधील यवतमाळ जिल्ह्यातील संपाची परंपरा आजही जिवंत आहे. सततच्या संघर्षामुळेच वीज उद्योगातील कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन, सुविधा आणि नोकरीतील स्थैर्य मिळाले आहे.
खाजगीकरणाविरोधात लढा सुरूच
कॉ. कृष्णा भोयर यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे खाजगीकरणाचे धोरण धोकादायक असल्याचे सांगितले. “महावितरण कंपनी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या नावाखाली आर्थिक शिस्त ढासळवत असून खाजगी भांडवलदारांच्या दबावाखाली काम करत आहे. हे मीटर बसवल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
मेळाव्यातील ठळक मुद्दे
कॉ. ए. बी. बर्धन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ
३१ नवीन वीज कामगारांचा संघटनेत प्रवेश
महावितरण व पारेषण कंपनीतील सध्याच्या स्थितीवर सविस्तर चर्चा
कामगार कायदे व जनसुरक्षा विधेयकाचा संघटनेतर्फे विरोध
मेळावा यशस्वी
या कार्यगौरव सोहळ्यास ४०० हून अधिक कामगारांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. यवतमाळ सर्कलमधील पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केल्याबद्दल उपस्थित
मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

























