विरकुंड–बोर्डा मार्गावर भीषण अपघात : जखमीवर उपचार सुरू, पोलिस कारवाईअभावी नातेवाईकांत नाराजी…
वणी तालुका : विरकुंड–बोर्डा मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने फोन करून साथीदारांना बोलावून घेतले आणि जखमीवर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या अपघातात नवेगाव येथील प्रकाश रामदास पुनवटकर (वय 39) हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आणि प्रकृती गंभीर असल्याने अखेर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेबाबत प्रकाश यांचे मित्र बंडू कवडू मोतेकर (वय 40, रा. विरकुंड नवेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ते व प्रकाश पुनवटकर दुचाकीवरून बोर्डा येथे कीटकनाशक औषध आणून परत येत होते. यावेळी पडवे यांच्या शेताजवळ समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर आरोपी चालकाने आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेतले व जखमी प्रकाश पुनवटकर याला चापट मारून घटनास्थळावरून पसार झाले.
सदर घटनेची तक्रार वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून BNS 2023 अंतर्गत कलम 281, 125(a), 125(b), 115(2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस जमादार बारसागळे करीत आहेत.
मात्र, या घटनेला दहा दिवस उलटूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने जखमीच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त
होत आहे.


























