“विनोद हा चिरंतन, हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान” — प्रा. डॉ. दिलीप अलोणे…

गुलबर्गा (कर्नाटक):
“विनोद हा चिरंतन आहे आणि हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी विनोदी साहित्याची जडणघडण केली; मात्र आजही हे साहित्य वाङ्मयीन प्रवाह म्हणून काहीसं दुर्लक्षित राहिलं आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांनी केले.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुलबर्गा येथे आयोजित “विनोदी साहित्याचे वास्तव आणि भवितव्य” या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. रणजीत शिंदे होते. यावेळी डॉ. अनिरुद्ध मोरे, कावेरी गजा कोश, प्रा. सर्वोत्तम सताळकर, विनोदी लेखक डॉ. रवींद्र तांबोळी, तसेच महामंडळाच्या कार्यवाहक सुनिता राजे पवार आणि विदर्भ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अलोणे म्हणाले, “धकाधकीच्या युगात मनावरील ताण हलका करण्यासाठी विनोदी साहित्याची नितांत गरज आहे. आजही विनोदी साहित्याची निर्मिती होत असली, तरी ते दुर्लक्षितच राहते. समाज माध्यमांवर विनोदाचा अतिरेक होत असला, तरी साहित्यिक दर्जाचा विनोद दुर्मिळ आहे. त्यामुळे विद्यापीठ स्तरावर स्वतंत्रपणे विनोदी वाङ्मयाचा अभ्यास आणि त्याच्या वाङ्मयीन मूल्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे.”
आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत डॉ. अलोणे यांनी मांडलेले विचार श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.

























