वणीतील भाजपला आज पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (बालासाहेब ठाकरे) शिंदे गटात प्रवेश केलेले भाजपचे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया हे आज वणीला परत आले. त्यांच्या स्वागतासाठी शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.
चोरडिया यांच्या स्वागतावेळी महिला कार्यकर्त्यांनी औक्षण केले, फटाक्यांची आतषबाजी झाली, आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणेने विजय चोरडिया ,आशिष काळे, राहुल मुंजेकर यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवराज पेचे, अनिल उलमाले, हिमांशु बोहरा, विक्रांत चचडा समवेत अनेक स्थानिक नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वणीतील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजय चोरडिया यांनी आपल्या राजकीय पुनरागमनाची औपचारिक सुरुवात केली.
विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना विजय चोरडिया यांनी वणी भाजपवर गंभीर आरोप केले.
ते म्हणाले —
“मला वणी भाजपमध्ये सतत अपमानास्पद वागणूक दिली गेली. मुद्दामहून मला कोणत्याही बैठकीत बोलावले जात नव्हते. वणी भाजप नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, ठेकेदारी राजकारण सुरू आहे आणि काही जण आपल्या मर्जीतील ठेकेदारांच्या माध्यमातून अमाप संपत्ती कमावत आहेत.”
चोरडिया यांनी पुढे स्पष्ट केले की,
“आगामी नगरपरिषद निवडणुकीत महायुती राहणार नाही. आम्ही शिवसेना (बालासाहेब ठाकरे) पक्षाच्या झेंड्याखाली पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहोत. माझ्यासोबत भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार आहेत.”
नांदेकरांचा गौप्यस्फोट-
या प्रसंगी बोलताना माजी आमदार विश्वास नांदेकर म्हणाले —
“मी मागील काही महिन्यांपासून विजय चोरडिया यांच्याशी संपर्कात होतो. ते केवळ वणीपुरते मर्यादित नाहीत, तर चंद्रपूर लोकसभेच्या पातळीवरही ते पक्षाची ताकद वाढवतील. विविध पक्षातील अनेक मोठे नेतेही शिवसेना (बालासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेशासाठी उत्सुक आहेत.”
राजकीय जाणकारांच्या मते,
“वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भाजपसाठी मोठा धक्का आहे. महायुतीचे स्थानिक समीकरण पूर्णपणे बदलू शकते.”
विजय चोरडिया यांच्या प्रवेशामुळे भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष थेट नगरपरिषदेच्या
रणांगणात पोहोचला आहे.

























