शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचं चटणी-भाकर आंदोलन; माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची टीका – “हा फक्त राजकीय स्टंट”
वणी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, हेक्टरी मदत तात्काळ द्यावी या मागणीसाठी उभाटाचे आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वाखाली वणीतील टिळक चौकात शिवसेना (उभाटा गट) तर्फे चटणी-भाकर आंदोलन आयोजित करण्यात आले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत चटणी-भाकर खाऊन आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी आरोप केला की सरकारकडून फक्त आश्वासनं मिळत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलेलं नाही. हेक्टरी १८,५०० रुपयांच्या मदतीची घोषणा फसली असून, शेतकरी आजही आर्थिक संकटात आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलनात कापसाला १५,००० व सोयाबीनला १०,००० रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी करण्यात आली. आमदार संजय दरेकर, नेते संजय निखाडे, विनोद ढोमणे, सुनील कातकडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आणि स्पष्ट केलं की, शिवसेना उभाटा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही.
मात्र या आंदोलनावर माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले,
“हे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंट आहे. या लोकांना शेतकऱ्यांविषयी खरी आपुलकी नसून, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हे सगळं राजकारण सुरू आहे.”बोदकुरवार यांनी पुढे सांगितले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची अंमलबजावणी केली असून ती प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागली आहे.
“महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या विधानानंतर वणीतील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शिवसेना (उबाठा) आणि भाजप नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगू लागली आहे.

























