वणी नगरपरिषदेच्या करमूल्यांकनास स्थगिती; माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या पाठपुराव्याला यश…
वणीकर जनतेला दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, वणी नगरपरिषदेतर्फे सन २०२५-२६ ते २०२८-२९ या कालावधीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनास स्थगिती देण्यात आली आहे.
अलीकडेच नगरपरिषदेकडून नागरिकांना नवीन करमूल्यांकनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये काही भागांमध्ये करात ३ ते ६ पट वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. हा निर्णय महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींविरोधात असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांत संताप पसरला होता.
या वाढीव करप्रकरणी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी वणीतील जनतेच्या वतीने दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने आदेश देत प्रस्तावित करमूल्यांकन स्थगित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाने याबाबतचे पत्र वणी नगरपरिषदेला नुकतेच पाठविले आहे.
या निर्णयामुळे वणीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिटी हब मिडिया वणी…

























