सिटी हब मिडिया वणी…
अनेक दिवसांपासून पक्षासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या आणि अल्पसंख्याक समाजातून येणाऱ्या एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनात आज तीव्र नाराजी आणि वेदना दाटल्या आहेत. पक्षाने सुरुवातीला तिकीट देण्याचे आश्वासन दिल्यावर त्याने आपल्या काम धंद्यापासून वेळ काढत दिवस-रात्र प्रभागात पक्षाचा झेंडा मजबूत करण्यासाठी श्रम घेतले.
या कार्यकर्त्याने आपल्या सोबत कार्य करणारी मोठी टीम तयार केली, प्रभागातील घराघरात प्रचाराचे नियोजन केले, आणि पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी सतत जनसंपर्क ठेवला. त्याला तिकीट मिळेल याची जवळपास खात्रीच होती.
परंतु निवडणुकीच्या तोंडावर अचानक समीकरण बदलले. पक्षात अलीकडेच दाखल झालेल्या काही व्यक्तींना महत्त्व देत तातडीने त्यांच्या नावावर तिकीट निश्चित झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तिकीटाची खरी अपेक्षा ठेवणाऱ्या या कार्यकर्त्याचा पूर्णपणे हिरमोड झाला.
मनातील वेदना व्यक्त करताना त्याने सांगितले, “मी अनेक दिवसांपासून प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले. माझ्या अल्पसंख्याक समाजातील लोकांनाही मी पक्षाशी जोडले. माझ्या टीमनेही दिवस-रात्र मेहनत घेतली. तरीही शेवटी माझ्यावर अन्याय झाला.”
त्याने पुढे म्हटले की, “आता मी राजकारणात जास्त सक्रिय राहणार नाही. माझे समर्थक जे योग्य समजतील ते करावं. मी आता प्रभागात प्रचारासाठी जाणार नाही.”
या घटनेमुळे स्थानिक राजकारणात चर्चा रंगल्या असून पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

























