सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेची जोरदार खेळी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने वाढणार राजकीय तापमान…
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबर ला सकाळी ११.४० वाजता, वणी शहरात शिवसेनेने आपली ताकद दाखवण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची वणीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात येत असून ही सभा शासकीय मैदानावर भव्य प्रमाणात होणार आहे. सभेच्या तयारीसाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून एपीएमसी मार्केटमध्ये हेलिपॅड उभारण्याचे काम देखील जलदगतीने सुरू झाले आहे.
शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत गंभीरतेने घेतल्याचे स्पष्ट संकेत या सभेच्या माध्यमातून दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे वणीतील शिवसेनेला नवीन ऊर्जा मिळेल आणि पक्षाच्या विजयाचा मार्ग अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पक्ष प्रवेशांच्या दृष्टीनेही ही सभा महत्त्वाची मानली जात आहे. मागील काही महिन्यांपासून विशेषतः संघटन मंत्री विजय चोरडिया यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. विविध जातधर्मातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवक शिवसेनेत दाखल होत असून आगामी सभेत काही मोठे चेहरेही पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेची प्रचार मोहीम वणी शहरात प्रभागनिहाय जोरात सुरू आहे. गुलाबी थंडीच्या वातावरणातही शिवसैनिकांचा उत्साह कमी नसून घराघरात पोहोचणारी ही मोहीम आता चांगलीच वेग घेऊ लागली आहे. यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती असे चित्र निर्माण झाले असून भाजपातील काही नाराज कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारीवर रिंगणात उतरल्याने निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. एकनाथ शिंदे यांचा वणी दौरा हा फक्त सभा न राहता पक्षबांधणी, पक्षविस्तार आणि विदर्भातील शिवसेनेची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.
वणी शहरात शिंदे यांच्या सभेनंतर राजकीय समीकरणे कशी बदलतात आणि कोणत्या बाजूला गती मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

























