सिटी हब मिडिया वणी…
कुणाल चोरडिया यांची शिवसेनेकडून पहिली कॉर्नर सभा; निखिल खाडे व इंदुताई पारखी यांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद…
भाजपला रामराम करत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले युवा नेतृत्व कुणाल चोरडिया यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित पहिल्या कॉर्नर सभेत दमदार भाषण करीत प्रचाराची आक्रमक सुरुवात केली. ही सभा निखिल उर्फ राजेश खाडे आणि इंदुताई पारखी यांच्या प्रचारासाठी विशेष आयोजित करण्यात आली होती.
सभेला प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. विशेषतः अल्पसंख्याक समाज, दलित समुदायाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सभेला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
आपल्या भाषणात कुणाल चोरडिया यांनी भाजप सोडण्यामागील कारणांचा विस्तृत खुलासा केला. भाजपमधील वारंवारचा अपमान, दुर्लक्ष आणि मानहानीकारक वागणूक यामुळेच त्यांनी पक्षाला रामराम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गटात मिळालेला मान-सन्मान, नेतृत्वाला दिला जाणारा सन्मान आणि विकासाचे स्पष्ट धोरण पाहून त्यांनी शिवसेना स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
कुणाल चोरडिया हे पूर्वी भाजप जिल्हा उपाध्यक्ष होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून घेतले. शिंदे साहेबांच्या वणीत झालेल्या सभेनंतर शिवसेना शिंदे गटासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून त्याचा योग्य फायदा घेण्यासाठी कुणाल चोरडिया आता प्रभागात जोरदार जनसंपर्क साधत आहेत.
प्रचारामध्ये त्यांना त्यांच्या वडिलांचा — विजय चोरडिया — ठोस आधार लाभत असून वडील–मुलगा ही दमदार जोडी घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसते.
निखिल खाडे व इंदुताई पारखी यांच्या कामगिरीची माहिती, तसेच प्रभाग ९ च्या विकासासाठी शिवसेना कोणत्या ठोस उपाययोजना करणार, हे कुणाल चोरडिया यांनी प्रभावीपणे जनतेसमोर मांडले.
त्यांच्या आक्रमक प्रचारशैली, प्रभावी संवादकौशल्य आणि तरुण नेतृत्वामुळे शिवसेना शिंदे गटाला निश्चितच नवी ऊर्जा प्राप्त होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

























