सिटी हब मिडिया वणी :
वणी–मारेगाव मार्गावरील सोमणाळा फाट्याजवळ आज (11 डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आणखी एक जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातात प्राण गमावलेल्याचे नाव प्रविण तुळशीराम येरेसे (वय ४५), रा. पांढरकवडा (पिसांगाव), ता. मारेगाव असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण येरेसे आणि त्यांचा नातेवाईक रवी येरेसे काही कामासाठी वणी शहरात आले होते. काम संपवून दोघेही दुचाकीने आपल्या गावाकडे निघाले असताना सोमणाळा फाट्याजवळ एका वेगाने येणाऱ्या टिपर वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की प्रविण येरेसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुचाकीवर मागे बसलेला रवी येरेसे हा किरकोळ जखमी अवस्थेत बचावल्याचे समजते.
या हृदयद्रावक अपघातामुळे पिसांगाव व पाहापल्ल परिसरात शोकाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

























