सिटी हब मिडिया वणी…
वणी पोलिसांची धडक कारवाई: मोमिनपुरा येथे अवैध गोवंश कत्तल व मांस विक्रीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त…
वणी शहरातील मोमिनपुरा परिसरात अवैध गोवंश कत्तल करून मांस विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वणी पोलिसांनी आज सकाळी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत सुमारे ३३,०६० रुपये किमतीचा गोवंश मांस व कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनपुरा येथील मोहम्मद एजाज अब्दूल अजीज कूरेशी यांच्या घरी अवैध गोवंश मांसाची कत्तल व विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून आज सकाळी ११ वाजता छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान घरात मोहम्मद एजाज अब्दूल अजीज कूरेशी (वय ५७) व मोहम्मद कैसर मोहम्मद अजीज कूरेशी (वय ४२) हे दोघे गोवंश मांस विक्री करताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला—
गोवंश मांस अंदाजे ७० ते ८० किलो (किंमत १६,००० रुपये)
लोखंडी धारदार सत्तूर ४ नग (किंमत ८०० रुपये)
लोखंडी वजन काटे व मापे २ नग (किंमत १,२०० रुपये)
जुने इलेक्ट्रिक खिमा मशीन १ नग (किंमत १५,००० रुपये)
प्लास्टिक पिशव्या (किंमत ६० रुपये)
एकूण ३३,०६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कनले यांनी गोवंश मांसाचे ५ नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले आहेत. नाशवंत मांस असल्याने मुख्याधिकारी, वणी यांच्याशी पत्रव्यवहार करून पंचासमक्ष त्याचा नाश करण्यात येणार आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५(सी), ९, ९(ए) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे, पो.हवा. बारसागरे, ना.पो.का. विशाल राठोड, पो.का. श्याम घुघे, पो.का. नंदकुमार पूप्पलवार, पो.का. गणेश मेश्राम, म.पो.का. पल्लवी बल्की व चालक पो.का. अरविंद यांचा समावेश होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास ना.पो.का. विशाल राठोड (पोलीस स्टेशन वणी) करत असून, अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

























