सिटी हब मिडिया वणी…
वणी तहसीलसमोरील चहा दुकानदार महिलेचे पोलीस ठाणेदारावर गंभीर आरोप; ठाणेदारांकडून आरोप फेटाळले…
वणी तहसील कार्यालयासमोर चहा दुकान चालवणाऱ्या आदिवासी समाजातील महिला रिना नंदू जुमनाके यांनी वणी पोलीस ठाण्यातील ठाणेदारावर जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन तसेच दुकान फेकून देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विशेष पोलीस महासंचालक (अमरावती विभाग), जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यवतमाळ यांनाही पाठविण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, काही महिन्यांपूर्वी अर्जदार रिना जुमनाके यांचा मुलगा साहिल जुमनाके याला एका पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने १६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री वणी पोलीस ठाण्यात बयानासाठी बोलावण्यात आले होते. यावेळी बयान नोंदवित असताना ठाणेदाराने जातिवाचक, अश्लील व अपमानास्पद शब्द वापरून शिवीगाळ केली तसेच, “तुझे चहा दुकान फेकून देईन, तहसीलसमोर दुकान ठेवू देणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्वतःसह मुलाचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे वणी शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून, सार्वजनिक ठिकाणी अपमान व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित ठाणेदाराविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांना वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी ठामपणे फेटाळले आहे. त्यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचा मुलगा हा अवैध धंदेवाइकांचा पंटर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला होता. त्या अनुषंगाने चौकशी सुरू असताना आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचा त्यांचा दावा आहे. बयान नोंदवित असताना कोणत्याही प्रकारची जातिवाचक किंवा अपमानास्पद भाषा वापरलेली नसून, आपण केवळ कायदेशीर कर्तव्य बजावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरोप–प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून, संबंधित प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार का, तसेच पुढील कायदेशीर कारवाई काय स्वरूपाची असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























