सिटी हब मिडिया वणी…
वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते विश्वास नांदेकर यांचे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री, 21 डिसेंबर रोजी अकरा वाजून पाच मिनिटांनी दुःखद निधन झाले. गुडघ्याच्या त्रासामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान झालेल्या संसर्गामुळे (इन्फेक्शन) त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि एकामागोमाग एक अवयव निकामी होत गेले. काही काळ त्यांची तब्येत स्थिर असल्याचे चित्र होते, मात्र अखेर काळाने आपला घाला घातला आणि विश्वास नांदेकर काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर रात्री सुमारे दोन वाजता मुंबईहून वणीसाठी रवाना करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बॅक कॉलनी, रविनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांच्या येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वास नांदेकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रात आपली ठसा उमटवणारी राजकीय कारकीर्द गाजवली. जनतेच्या प्रश्नांसाठी तत्काळ धावून जाणारा, सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती होती. वणी तालुक्यात शिवसेना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. त्यांच्या कारकीर्दीत अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले. अलीकडच्या काळात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता आणि त्या पक्षाच्या वाढीसाठी ते प्रयत्नशील होते.
नगरपालिका निवडणुकांच्या काळात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते प्रत्यक्ष मैदानात उतरू शकले नाहीत. त्यांच्या निधनाने वणीतील राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला असून, “एका युगाचा अंत” अशी भावना सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
अंतिम संस्काराबाबत कुटुंबीय चर्चा करून निर्णय घेणार असून, ते वणीमध्ये करायचे की त्यांच्या पैतृक गावी, याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विश्वास नांदेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सिटी हब मिडिया वणी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

























