सिटी हब मीडिया वणी…
वणी नगरपालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने पराभूत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि वणी शहराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत उमेदवारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत असून, त्यांना धीर देण्याचे काम सुरू आहे.
या भेटीदरम्यान भाजप नेते पराभूत उमेदवारांना पक्ष आपल्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे, असा विश्वास देत आहेत. निवडणुकीतील पराभव हा राजकीय प्रवासातील एक टप्पा असून, भविष्यात पक्ष संघटनेत त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची राहील, असा दिलासाही यावेळी देण्यात येत आहे.
दरम्यान, एका पराभूत महिला उमेदवाराला शहर संघटनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे भाजप महिला आघाडी व शहर संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पक्ष पावले उचलत असल्याचे चित्र आहे.
पराभूत उमेदवारांचे मनोबल टिकवणे, पक्षातील एकजूट मजबूत ठेवणे आणि संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करणे, या उद्देशाने भाजप नेतृत्वाकडून हा संपर्क आणि संवाद वाढवण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

























