सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपरिषद निवडणूक 2025 : राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचा सकारात्मक संदेश…
वणी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपच्या मा. विद्या सचिन आत्राम यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन करत उबाठाच्या संचिता नगराळे आणि शिवसेनेच्या पायल तोडसाम यांचा पराभव केला. त्यांच्या या दणदणीत विजयानंतर वणीच्या राजकारणात एक सकारात्मक चित्र उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.
आज शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी विद्याताई आत्राम यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “निवडणुका संपल्या असून आता राजकीय कामकाज बाजूला ठेवून जनतेची सेवा करण्याची वेळ आहे.” वणीच्या विकासासाठी विद्याताई आत्राम यांना कुठलीही मदत लागल्यास आपण नेहमी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 
याच अनुषंगाने शिवसेनेतर्फे भाजपच्या वणी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. विद्या सचिन आत्राम यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. वणीच्या विकासासाठी त्यांचा कार्यकाळ यशस्वी व लोकहिताचा ठरो, अशी सदिच्छा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
महायुतीमध्ये असूनही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी वणी नगरपरिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली, तरी पक्षाला चांगली मते मिळाली असून वणीमध्ये शिवसेनेची राजकीय बाजू भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजय चोरडिया यांनी पुढे सांगितले की, राजकीय मतभेद दूर सारून वणीच्या सर्वांगीण विकासासाठी विद्याताई आत्राम यांना शक्य तेवढे सहकार्य केले जाईल आणि विकासाच्या प्रत्येक भूमिकेला शिवसेनेचे समर्थन राहील.
दरम्यान, विद्याताई आत्राम यांनीही विजय चोरडिया व शिवसेनेच्या शुभेच्छांचा स्वीकार करत, “मी सर्वांना सोबत घेऊन वणीच्या विकासासाठी काम करणार आहे,” अशी ग्वाही दिली.
निवडणुकीपूर्वी झालेले आरोप-प्रत्यारोप विसरून आता वणीतील राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, ही बाब वणीकरांसाठी आशादायी मानली जात आहे.

























