सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपालिकेत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपकडून स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे एकूण १८ नगरसेवक निवडून आल्यामुळे पक्षाला दोन स्वीकृत सदस्य नेमण्याचा अधिकार मिळाला असून, त्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.
भाजपकडून नेमण्यात येणाऱ्या दोन स्वीकृत सदस्यांपैकी एका पूर्व नगरसेवकाचे नाव सध्या चर्चेत आहे. संबंधित व्यक्ती आपल्या प्रभागात लोकप्रिय असून जनतेच्या विविध समस्या व तक्रारींसाठी ते सातत्याने नगरपालिकेत पाठपुरावा करताना दिसतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी सक्रिय राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, दुसऱ्या स्वीकृत सदस्याच्या नावाबाबत पक्षश्रेष्ठींकडून सध्या सविस्तर चर्चा सुरू आहे. नगरपालिका कामकाजाची जाण, सामाजिक कार्यातील योगदान, पक्ष व संघटनेशी निष्ठा तसेच कार्यकर्त्यांचा पाठिंबा या बाबी लक्षात घेऊन योग्य व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळत आहे. यासाठी आणखी काही नावांचीही चर्चा सुरू आहे.
भाजपकडून १२ जानेवारी रोजी स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाणार असून, त्याच दिवशी उपाध्यक्षांची निवडही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच याच दिवशी वणी नगरपालिकेवर भाजपचे नगरसेवक व नगराध्यक्ष आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.
या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्य म्हणून अंतिमतः कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होतो, याकडे वणी शहराचे लक्ष लागले आहे.

























