सिटी हब मिडिया वणी…
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर वाढत चाललेले अत्याचार, हत्या, धार्मिक छळ आणि असुरक्षिततेच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत हिंदू राष्ट्र समन्वय समितीने भारत सरकारकडे ठोस हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बांगलादेशात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंवर हल्ले, घरफोडी, मंदिरे उद्ध्वस्त करणे, जबरदस्ती धर्मांतर, महिलांवरील अत्याचार आणि हत्यांचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. अलीकडील काळात काही निर्दोष हिंदू युवकांच्या अमानुष हत्यांच्या घटनांमुळे संपूर्ण हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समितीने आपल्या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंच्या लोकसंख्येचा उल्लेख करताना सांगितले की, पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेली हिंदू लोकसंख्या आता झपाट्याने घटत असून यामागे सततचा हिंसाचार, धार्मिक छळ आणि असुरक्षिततेची भावना कारणीभूत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यात यावी.
दोषींवर कठोर कारवाई व्हावी व पीडितांना योग्य भरपाई मिळावी.
भारत–बांगलादेश दरम्यान अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्य व सुरक्षेबाबत स्वतंत्र करार करण्यात यावा.
संयुक्त राष्ट्र, मानवाधिकार आयोग व SAARC स्तरावर हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात यावा.
बांगलादेशातील मंदिरे, स्मशानभूमी व धार्मिक संपत्तीचे संरक्षण आणि डिजिटल नोंदणी करण्यात यावी.
अत्याचार थांबले नाहीत तर कूटनीतिक व आर्थिक दबाव टाकण्याचा विचार करावा.
भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदूबहुल देश असून शेजारी राष्ट्रातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारताने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी नम्र विनंती समितीने आपल्या निवेदनात केली आहे.


























